रत्नागिरी : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ते सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) सहभागी होण्यासाठीची लिंक वेळेत न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तब्बल दोन तास प्रतीक्षेत राहिले.

दुपारी १२ वाजता सुरू होणाऱ्या बैठकीची लिंक दुपारी पावणेदोन वाजेपर्यंतही न मिळाल्याने दिशा समितीची बैठक त्यांच्या सहभागाशिवायच पार पडली. त्यानंतर रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होताच आमदार जाधव यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

“लोकप्रतिनिधींना बैठकीची वेळ आणि लिंक वेळेत पाठवण्याचाही शिष्टाचार पाळला जात नाही का? ही नेमकी कोणती कार्यपद्धती आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केला. तसेच, बैठकीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जाब विचारत, अशा प्रकारची बेपर्वाई अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.