रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत, “योजनेचे श्रेय घेण्यापेक्षा तिचा प्रभावी पाठपुरावा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे म्हटले आहे.

योगेश कदम यांनी सांगितले की, या योजनेसाठी नगरविकास विभागाकडे सुमारे सव्वा वर्ष सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यावेळी नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यानंतर योजनेला मंजुरी मिळाली.

मात्र, आरोग्य विभागाच्या जागेसंदर्भातील प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्यामुळे योजना सुरू होऊ शकलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्याबाबत चर्चा झाल्याचाही दावा त्यांनी केला.

यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधताना योगेश कदम म्हणाले, “मंत्रालयात फाईल नेमकी कुठे आहे, याची माहिती नसताना श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.” तसेच, नगराध्यक्षांकडूनही आवश्यक पाठपुरावा झाला नसल्याची टीका करत केवळ राजकीय श्रेयासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.