लोटे : – पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि तरुण पिढीमध्ये निसर्गा विषयी सजगता निर्माण करणाऱ्या उद्देशाने दिनांक 14 जुलै 2026 रोजी लवेल येथील नामांकित घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “हॉर्नबिल देवराई” या अभिनव उपक्रमाचे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या महाविद्यालयीन परिसरात निसर्ग संरक्षणाचा एक नवा अध्याय सुरू झाला असून याप्रसंगी महाविद्यालयामध्ये हॉर्नबिल क्लब ची अधिकृत स्थापना देखील करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी चिपळूण वन विभागाच्या विभागीय वन अधिकारी मा. गिरीजा देसाई मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. हा संपूर्ण प्रकल्प सह्याद्री संकल्प सोसायटी देवरुख या नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या आणि वन विभाग चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने व तांत्रिक सहकार्यातून साकारला जात आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीला फाटा देत अत्यंत पर्यावरण पूरक मार्गाने झाली फार्मिंग देवराईच्या प्रत्यक्ष मैदानावर प्रमुख पाहुण्या मा. गिरीजा देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील,अधिष्ठाता विभागप्रमुख, विद्यार्थी, सह्याद्री संकल्प सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सह्याद्रीच्या हवामानाला पूरक असलेल्या आणि हॉर्नबिल धनेश पक्षांना आकर्षित करणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली या वृक्षारोपणाने संपूर्ण परिसरात एक नवीन चेतना निर्माण केली.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि या संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि प्रकल्प अधिकारी डॉ. नितीन कोळेकर यांनी दिली. आपल्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. नितीन कोळेकर म्हणाले, “सह्याद्रीची पर्वतरांग ही जागतिक स्तरावर जैवविविधतेचे अतिसंवेदनशील केंद्र म्हणून ओळखले जाते या भागात राहणारा हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी हा जंगलाचा खऱ्या अर्थाने शेतकरी आहे विस्तीर्ण जंगलाची निर्मिती आणि संवर्धन या पक्षाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे हीच बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या परिसरात हॉर्नबिल देवराई विकसित करण्याचा संकल्प आम्ही केला असून केवळ वृक्ष लावणे हा आमचा हेतू नसून संपूर्ण परिसंस्था पुनर्जीवित करणे हे आमचे ध्येय आहे”.
महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या शाश्वत विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील सर यांनी दिली.
या सोहळ्याचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेला “हॉर्नबिल क्लब”. या क्लबच्या माध्यमातून भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सह्याद्री संकल्प सोसायटीचे संचालक श्री प्रतीक मोरे यांनी आपल्या प्रेझेंटेशन मधून दिली. हॉर्नबिलक्लब हा केवळ कागदावर राहणारा क्लब नसेल तर तो विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून चालणारे एक जिवंत उपक्रम असेल. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव निरीक्षण, पक्षी गणना, पर्यावरण संवर्धन कार्यशाळा, निसर्ग भ्रमंती आणि शाश्वत जीवनशैलीविषयक प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाईल. तरुण पिढीने निसर्गाशी जोडले जाणे ही काळाची गरज आहे आणि घरडा इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी याबाबत एक आदर्श निर्माण करतील असे प्रतिपादन त्यांनी या निमित्ताने केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या चिपळूण वनविभागाच्या डी एफ ओ मा. गिरीजा देसाई मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले. मानवी आयुष्यातील जंगलाचे आणि वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी अत्यंत सोपे आणि अभ्यासपूर्ण भाषेत पटवून दिले निसर्गाचा समतोल राखण्यात प्रत्येक घटकाचा वाटा असतो जंगले नसतील तर मानवाचे असतो धोक्यातील आज सिमेंटची जंगले वाढत असताना घरडा इन्स्टिट्यूट सारखे असे शैक्षणिक संस्थेने देवराई उभारण्यासाठी पुढे येणे ही अत्यंत कौतुकास्पद आणि दिशादर्शक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले वनविभाग या प्रकल्पासाठी नेहमीच पाठीशी उभा राहील याची ग्वाही त्यांनी या वेळेला दिली. विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनिअरिंगचे शिक्षण न घेता पर्यावरणाचे इंजिनियर बनवून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी या वेळेला व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पाटील त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अत्यंत भाविक व तितकाच खंबीर निर्धार व्यक्त केला. देवराईची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी घेतील हा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच ग्वाही दिली की ही देवराई केवळ लावली गेलेली नाही तर तिचे व्यवस्थितपणे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही सर्व कॉलेज मिळून करेल आणि या कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी जेव्हा पदवी घेऊन बाहेर पडेल तेव्हा तो निसर्गाप्रती एक संवेदनशील नागरिक बनून बाहेर पडेल तसेच ही देवराई येत्या काही वर्षात पक्षांचे आणि विविध वनस्पतींचे नंदनवन बनेल अशी हमी त्यांनी या निमित्ताने दिली.
हा संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साही आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी तसेच सह्याद्री संकल्प सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले. महाविद्यालयातील CES विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रतिक ओक यांनी हा प्रकल्प उभा राहण्यासाठी करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट(जीआयटीएम) लवेल येथे “हॉर्नबिल देवराई” उपक्रमाचे दिमाखात उद्घाटन; महाविद्यालयात “हॉर्नबिल क्लब ची” स्थापना
