लांजा: (गोविंद चव्हाण)भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारने महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून धडक देत कार मधील चार जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक तसेच डंपर चालक या दोघांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारने मुंबई-गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस शांतीनगर येथे महामार्गावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबईच्या नागपाडा येथील कुरेशी कुटुंबावर काळाने घाला घातला होता.‌ या दुर्घटनेत क्रेटा कार मधील यास्मीन इरफान कुरेशी (वय ५४), फिजा अनस कुरेशी (वय २७), महम्मद इरफान इस्लाम कुरेशी (वय १५) आणि चालक मुस्तफा अल्ताफ काफी (वय २०) या चौघांचा मृत्यू झाला होता. तसेच, कारमधील महम्मद अनस इरफान कुरेशी हा गंभीर जखमी झाला होता. अपघात बुधवारी १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडला होता.

रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, क्रेटा कार हयगयीने, निष्काळजीपणे, भरधाव वेगाने चालवून बंद डंपरला पाठीमागून थडक देत अपघात करून गाडीतील चार जणांच्या मृत्यूस तसेच दुखापती आणि स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी, दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी क्रेटा कार चालक मुस्तफा काफी (वय २०, रा.मदिना मशिद, जि.जामनगर, राज्य.गुजरात) याच्यावर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर धोकादायक स्थितीत डंपर उभा करून त्याच्या मागील बाजूस टेल लाईट, रेडियम रिफ्रॅक्टर पट्ट्या, साईट इंडिकेटर, लाईट अगर इशारा दर्शवणारी कोणतीही परावर्तित चिन्हे नसताना सदर वाहन उभे करून सोडून दिले म्हणून डंपर चालक महेश कुमार नुन्नुचँद महतो (वय २६, मुळ रा.पंचायत चिरुवा, ता.सरीया, जि. गिरीडिह, राज्य.झारखंड, सध्या रा.पाली येथे इंद्रदीप यांचे कन्स्ट्रक्शन साइटवर) या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २०२३ चे कलम १०६(१), २८१, २८५, १२५(अ), १२५(ब), १८४, १२२ आणि मोटारवाहन कायदा कलम १८४, १२२ व केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९ चे कलम १०४ सह मोटारवाहन कायदा कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे करत आहेत.