लांजा : (गोविंद चव्हाण) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर विधानसभा मतदारसंघनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लांजा येथे २२ जुलै रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आले असून, बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लांजा शहरातील जावडे रोड येथील गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) येथे ते पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागासह शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचे प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लांजा व राजापूर तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
या शिबिरासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत, राजापूरचे उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे, तसेच लांजा व राजापूर तालुक्यांतील सर्व स्तरांतील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.