मुंबई : लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करणारे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सलग २० दिवस उपोषण केले. अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांशी सन्मानपूर्वक संवाद साधणे ही लोकशाही सरकारची जबाबदारी असताना, केंद्र सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याची भूमिका घेतली. या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले.

मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या या आंदोलनात युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक, विद्यार्थी आणि पदाधिकारी सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढणे अपेक्षित असते. मात्र जंतरमंतर येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून सरकारने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा मार्ग स्वीकारला. ही लोकशाहीची गळचेपी असून केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे म्हणाले की, “विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलन चिरडून तरुणांचा आवाज कधीच बंद करता येणार नाही. देशातील विद्यार्थी आणि युवक लोकशाही, संविधान आणि आपल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. हुकूमशाही वृत्तीला देशातील तरुण हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत.

आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीला जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी स्पष्ट इशारा दिला की, विद्यार्थी, युवक आणि लोकशाही हक्कांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाविरोधात भविष्यातही राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.

यावेळी प्रमोद बागल, सचिन नारकर, प्रतीक नांदगावकर, ट्विंकल परमार, हरून खान, शहाबाद पटेल, शेख नाझीर , विश्वास आव्हाड यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.