चिपळूण – चिपळूण नगरपालिका क्षेत्रांतर्गत नगर बाल संरक्षण समिती अध्यक्षपदी भाजपा नगरसेविका अंजली कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिपळूण नगरपालिकेच्या कौन्सिलमध्ये याबाबत चर्चा होऊन ठराव मांडण्यात आला. या ठरावाला सर्वच नगरसेवकाने अंजली कदम यांच्या नावाला पाठिंबा दिला.
महिला व बालविकास विभाग शासन यांच्या निर्णयानुसार नगर परिषद क्षेत्रामध्ये ” नगर बाल संरक्षण समिती ” स्थापन करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. बाल संरक्षण यंत्रणा बळकट करणे, बालकांच्या संरक्षणासंदर्भातील विविध योजना व सेवांमध्ये समन्वय निर्माण करणे तसेच बालकांविरुद्ध होणारे अत्याचार, शोषण , दुर्लक्ष, बालमजुरी , बालविवाह व बाल तस्करी यांस प्रतिबंध घालणे यासाठी सदर समिती काम करणार आहे. या समितीमध्ये अध्यक्षांसहित दहासदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. समिती गठीत झाल्यापासून पाच वर्षांसाठी कार्यरत रहाणार आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कौन्सिलमध्ये भाजपाचे गटनेते शशिकांत मोदी यांनी अंजली कदम यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला या प्रस्तावाला नगरसेवक शुभम पिसे यांनी अनुमोदन दिले व सर्वच नगरसेविकांनी नावाला पाठिंबा दिला . अंजली कदम यांनी प्रतिक्रिया देताना सत्ताधारी भाजप – शिवसेना युतीचे सर्व गटनेते नगरसेवक तसेच विरोधी पक्षाचे ही गटनेते आणि नगरसेवक यांचे आभार मानले आहेत. नगरसेविका अंजली कदम या सामाजिक क्षेत्रात गेले वीस वर्षे कार्यरत असून त्या हेल्प फाउंडेशन चिपळूण या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत तसेच त्यांनी लायन्स क्लब चिपळूणचे अध्यक्षपदही यापूर्वी भूषवलेले आहे. या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महिला व बालकांच्या प्रश्नाबाबत व समस्यांबाबत काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे
