लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील गेल्या तब्बल १४ वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलावरून अखेर गुरुवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई पासून गोवा अशी एक लेन वाहतूकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे लांजावासीयांसह मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची प्रतीक्षा संपली आहे.

लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि शहरातील वाढता वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र विविध कारणांमुळे गेल्या १४ वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते. अखेर गुरुवारी या पुलाची एक लेन वाहतूकीसाठी खुली झाल्याने लांजाच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या उड्डाणपुलाची एकूण लांबी पावणेदोन किलोमीटर आहे. कोर्ले फाटा ते भूमी अभिलेख कार्यालयापर्यंत सुमारे ९७५ मीटर लांबीचा मुख्य पूल असून त्याला तब्बल ५० पिलर आहेत. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी सुमारे ४५० मीटर लांबीच्या रिटेनिंग वॉल उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण उड्डाणपुलाची रचना सुमारे पावणेदोन किलोमीटरची आहे.

उड्डाणपूलाची एक लेन सुरू झाल्यामुळे लांजा शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून महामार्गावरील प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः गणेशोत्सच्या सणासुदीच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या पुलाचा मोठा फायदा होणार आहे.

उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर कामाला गती मिळाली असून त्याचाच एक भाग म्हणून उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तर उड्डाणपुलाचे उर्वरित कामही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून संपूर्ण उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेकडूनर कार्यवाही सुरू आहे. संपूर्ण पूल कार्यान्वित झाल्यानंतर लांजा शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, एक लेन वाहतुकीसाठी खुली करताना लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, शेखर स्वामी, बाबा भिंगार्डे, ईगल इन्फ्रा कंपनीचे सितलानी, अकबर नाईक, नगरसेविका निधी गुरव, स्वरूप गुरव, राजू राणे, बाबा भिंगार्डे, शिवप्पा उकली आदी उपस्थित होते.

तब्बल १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उड्डाणपूलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली झाली असून दुसरी लेन गणपतीच्या अगोदर ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू होईल असे ठेकेदार कंपनीच्या अधिकारींकडून सांगण्यात आले.