लांजा : (गोविंद चव्हाण) : ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक; हेरीटेज आश्रमशाळेत लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जावडे येथे शनिवारी (दि. २५ जुलै) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि उत्साहात पार पडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत लोकशाहीचा पहिला धडा गिरवला.

गेल्या आठवडाभरापासून शाळेत निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणूक समितीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, उमेदवारी अर्ज भरणे, निवडणूक चिन्हांचे वाटप, प्रचार, आचारसंहितेचे पालन, मतदान, मतमोजणी, खातेवाटप आणि शपथविधी अशा सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविल्या. विशेष म्हणजे, मतदानासाठी अत्याधुनिक ईव्हीएम ॲप (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) चा वापर करण्यात आला.

उमेदवारांनी वर्गागणिक जाऊन आपल्या निवडणूक चिन्हाची माहिती देत विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे संपूर्ण शाळेत निवडणुकीचे उत्साही वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची प्रभावीपणे ओळख झाली.

संस्थेचे संस्थापक संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. निवडणुकीनंतर संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अपर्णा पवार यांनी विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास, जबाबदारीची जाणीव, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि संघभावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास मुख्याध्यापक गजानन पांचाळ यांनी व्यक्त केला.