जळगाव:- देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचली? मध्यस्थांच्या माध्यमातून व्यवहार झाले? जर हे खरं असेल, तर हा लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर टाकलेला दरोडा आहे. महाराष्ट्रात एकामागून एक भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. मेहनत करणारा विद्यार्थी आजही रस्त्यावर आहे आणि गैरमार्गाचा अवलंब करणारे पुढे जात आहेत, अशी भावना तरुणांमध्ये निर्माण झाली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
अशा परिस्थितीत शासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाची SIT किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी. CDR, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित सर्व बाबींची तपासणी करून दोषींना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रातही जंतर मंतर झाल्याशिवाय गत्यंतर नाही. विद्यार्थी आणि सरकार आमनेसामने आले तर मग शासनाला ठरवावे लागेल की महाराष्ट्राचा धर्मेंद्र प्रधान कुणाला करायचे असंही त्या म्हणाल्या.
