चिपळूण : गेली तब्बल 17 वर्षांपासून सुरू असलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्णत्वास न आल्याने वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात महामार्गावर ठिकठिकाणी पडणारे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून प्रवास जीवघेणा बनत आहे.
उन्हाळ्यात रस्त्यावर खड्डे पडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. पावसाळ्यात खड्डे पडू लागल्यानंतर केवळ खडी तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र सततचा पाऊस आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे काही दिवसांतच पुन्हा खड्डे उघडे पडतात. परिणामी वारंवार त्याच ठिकाणी दुरुस्ती करावी लागते, तर काही ठिकाणी दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जाते.
चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात वाशिष्टी नदी पुलाजवळील ॲप्रोच रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या ठिकाणी वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. चारचाकी किंवा अवजड वाहने या खड्ड्यांतून वेगाने गेल्यास दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलमिश्रित पाणी उडत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत.
महामार्गावरील वाढती वाहतूक आणि खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने व ठेकेदाराने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.