छत्रपती संभाजीनगर : “भाजपमध्ये प्रवेश कर, अन्यथा गोळ्या घालू,” अशा प्रकारच्या धमक्या मला आणि माझ्या कुटुंबाला देण्यात आल्या असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थी आंदोलनातील कार्यकर्ते अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत केला. आपण भाजपकडून आलेल्या ऑफर नाकारल्या असून कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिपके म्हणाले की, पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून हा विद्यार्थ्यांच्या संस्कृतीवरच हल्ला आहे. “आम्ही संविधानाच्या मार्गाने लढत आहोत. लोकशाहीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना बदनाम करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.

रामदेव बाबा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले की, “Gen Z आपली संस्कृती जपण्यास सक्षम आहे. रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांवर टीका करण्याऐवजी पतंजलीच्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अन्यथा पतंजली बंद पडण्याची वेळ येईल.”

संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राकेश टिकैत यांच्यासह किसान नेत्यांनी आम्हाला “तुम्ही आमच्या मुलांसारखे आहात,” असे सांगत साथ दिली. भविष्यात शेतकऱ्यांना गरज भासल्यास आम्हीही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे त्यांनी सांगितले. माझे कुटुंबही शेतीशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.