महाड (मनोज खांबे ): महाड तालुक्यातील शिवथर खोऱ्यात शुक्रवार (३१ जुलै) रोजी पहाटेपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून तालुक्याला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आंबेनळी, आंबे शिवथर आणि सह्याद्री वाडी या तीन गावांचा महाड तालुक्याशी थेट संपर्क तुटला आहे. परिणामी या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

शिवथर खोऱ्यात अविरत सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि नोकरदार कर्मचाऱ्यांना बसला आहे. आंबेनळी, आंबे शिवथर व सह्याद्री वाडी येथून कुंबे शिवथर हायस्कूल येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुलावरून पाणी वाहत असल्याने आज शाळेत जाता आले नाही.

प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पूरग्रस्त भागापासून सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.