पेण : पौर्णिमेचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा, शाखा पेण तालुक्याच्या वतीने शहरातील श्रमण बुद्धविहार येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या प्रवचन मालिकेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय शिक्षक तथा प्रवचनकार संतोष जाधव यांनी बौद्ध धम्माचे महत्त्व विशद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना संतोष जाधव म्हणाले, “बौद्ध धम्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार सत्य, करुणा, समता आणि प्रज्ञेचा मार्ग स्वीकारून जीवन जगल्यास मानवी जीवनाचे खरे सार्थक होते.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे होते. यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग जाधव, वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुकाध्यक्ष सुनील धामणकर, प्रा. एल. एन. कुमारे, गंगाराम गायकवाड, मारुती शिंदे, बौद्धाचार्य कृष्णा गायकवाड, बुद्धविहार समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, महिला तालुका सचिव शशिकला गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की, वर्षावास धम्म प्रवचन मालिकेची परंपरा यंदाही तालुक्यातील विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म हा मानवकल्याणाचा आणि प्रेरणादायी विचारांचा मार्ग असून तो समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य भारतीय बौद्ध महासभा सातत्याने करत आहे. नागरिकांनी बौद्ध धम्मातील विचार आत्मसात करून समतेच्या समाजनिर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
