खेड : सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या मान्यवरांचा सत्कार तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले आणि श्री. संजय मोदी यांची सहजीवन शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच नियत वयोमानानुसार अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री. डी. एम. शिंदे आणि हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. विद्या शिंदे यांच्या सेवापूर्तीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त व खजिनदार विलासभाई बुटाला, विश्वस्त हेमंत शेठ, आयटी विभागाचे संचालक अमोलभाई बुटाला यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली. याच प्रसंगी नुकतीच उपप्राचार्यपदी नियुक्ती झालेल्या प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. आर. एस. भालेराव यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी विज्ञान परिचर अवधूत कुलकर्णी, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सी. आर. साळुंखे आणि डॉ. एच. पी. थोरात यांनी सत्कारमूर्तींसोबतच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत सत्कारमूर्तींचे योगदान अधोरेखित करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उत्तरपर भाषणात ॲड. आनंदराव भोसले यांनी संस्थेने दिलेल्या नव्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. सेवानिवृत्त श्री. डी. एम. शिंदे यांच्या वतीने सौ. दक्षता शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या सेवाकाळाचा आढावा घेतला, तर प्रो. डॉ. विद्या शिंदे यांनी आपल्या दीर्घ शैक्षणिक कारकिर्दीतील अनुभव आणि आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या.