खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या पुढाकारातून आणि लायन बशीरभाई हजवानी फाउंडेशन, खेड यांच्या अर्थसहाय्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निळवणे येथे शाळेच्या इमारतीवर पत्रा व संरक्षक शेडचे बांधकाम करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले.
विद्यार्थ्यांना सुरक्षित व पावसापासून संरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या या कामामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
लोकार्पण कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष लायन अविनाश दळवी यांच्यासह लायन संदीप मोरे, लायन प्रसाद सेठ, लायन सुरेश चिकने, लायन ज्ञानेश्वर मरकड, लायन विनोद मोरे आणि लायन माणिक लोहार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा सक्षम करण्यासाठी अशा लोकहितकारी उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्मिता खोपडे, दीपिका निर्मळ, मुख्याध्यापक नितीन साळुंखे, शिक्षक, ग्रामस्थ, माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.