मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नीट पेपरफुटी संदर्भातील सविस्तर माहिती असलेली पत्रके वाटली. या पत्रकांमध्ये देशभरात उघड झालेल्या विविध पेपरफुटी प्रकरणांची माहिती, अटक करण्यात आलेल्या आरोपींची पार्श्वभूमी, तसेच पेपरफुटी रॅकेट आणि सत्ताधारी भाजपाशी संबंधित व्यक्तींमधील संबंध यांचा उल्लेख करण्यात आला होता. “पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील चूक नसून ही संघटित भ्रष्ट व्यवस्थेची देण आहे,” असा आरोप यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या घोटाळ्यामुळे देशातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे सांगितले. “विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात, मात्र सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणाखाली पेपर विकले जात असतील तर सामान्य विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा?” असा सवाल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.