पेण : पेण तालुक्यातील नागरिकांना अधिक सुलभ व दर्जेदार शासकीय सेवा मिळाव्यात यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पेण प्रांत कार्यालय परिसरात नवीन एकात्मिक प्रशासकीय भवन उभारण्याच्या प्रलंबित प्रस्तावाला तातडीने प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्याची मागणी केली.
पेण येथील सध्याचे तहसील कार्यालय ब्रिटिशकालीन जुन्या इमारतीत कार्यरत असून वाढत्या प्रशासकीय गरजांसाठी ते अपुरे पडत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. नवीन एकात्मिक प्रशासकीय भवन उभारल्यास विविध शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल तसेच प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.