लोटे : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथील रासायनिक अभियांत्रिकी विभागात शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. हा अभिनव कार्यक्रम स्टुडंट्स पायोनियर असोसिएशन ऑफ केमिकल इंजिनिअर्स (SPACE) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. एस. पी. जाधव  आणि प्रा. व्ही. बी. सावंत  यांनी केले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, अध्यापनातील आव्हाने तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळाली.

या उपक्रमात यश निमकर, अब्दुल्ला परकार, आबिद घन्सार, सेहरान अधिकारी, आदित्य कराडकर, रिद्धेश घाटे, सुजल महाडिक, बासिल दळवी आणि सत्यम जैस्वाल यांनी शिक्षकांची भूमिका उत्स्फूर्तपणे साकारली.
या कार्यक्रमामध्ये बेस्ट स्टुडन्ट-टीचर अवॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी डॉ. एन. वाय. घारे आणि डॉ. एस. डी. डोके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत यश निमकर याने प्रथम क्रमांक मिळविला, तर बासिल दळवी याने द्वितीय क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमासाठी डॉ. एन. ए. कोळेकर, अधिष्ठाता (Dean – Academics) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा अभिनव उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत होते, असे सांगितले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सर, उप- प्राचार्य डॉ. एस. के. पाटील , रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे, रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. जे. कुलकर्णी सर तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारत केलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.