पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील ‘आमची माती आमची माणसं’ सामाजिक संघटनेने संस्थापक राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली 15 एप्रिल 2026 रोजी दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलसमोरील आंदोलनानंतर आजतागायत नगरपंचायत पोलादपूरच्या प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने कोणतेही पाऊल न उचलल्याने गुरूवार, दि. 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता कचराप्रवण क्षेत्राबद्दल पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदालनाला पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचानेही पाठिंबा दर्शवित पोलादपूरकर नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पोलादपूर नगरपंचायतीने वर्षाला 79 लाख रूपयांची निविदा कचरा उचलून विल्हेवाट लावण्याकामी ठेकेदाराला दिल्यानंतरही सफाई कामगारांची संख्या कमी असतानाही जास्त संख्या दाखवून रोजमजूरीवर डल्ला मारणे तसेच कचऱ्यातील प्लास्टीकच्या वस्तू तसेच तांबे, पितळ, स्टील आदी धातूंच्या वस्तूंना चरई फाटयाजवळील भंगारविक्रेत्याकडे कचरा गाडी उभी करून रितसर वजनकाटयावर पिशव्या ठेऊन वजन करून कचऱ्यातून भंगारविक्रीचाही प्रकल्प राबविण्यात आला असल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनावर कचरा ठेकेदार आणि कचराप्रवण क्षेत्रासंदर्भात कोणतेही नियंत्रण नसल्याचे उघड झाल्याने आजच्या आंदोलनाप्रसंगी पोलादपूरकर जनतेसह ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेकडून जाब विचारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.