सावर्डे : शिवसेना नेते, माजी मंत्री, आमदार भास्करशेठ जाधव यांचे कट्टर समर्थक, निवळी – पालवण येथील प्रसिद्ध उद्योजक, माजी ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समितीच्या माजी सदस्या संध्याताई रेपाळ यांचे पती रमेशशेठ शिवाजी रेपाळ यांचे दि. 24 एप्रिल रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यू समयी ते 60 वर्षाचे होते.

निवळी – पालवण परिसरातील सामाजिक कार्यात रमेशशेठ रेपाळ अग्रेसर असत. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेल्या आणि समाजासाठी सदैव झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे निधन ही अत्यंत वेदनादायी बातमी आहे. प्रथितयश उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
श्री हनुमान सेवा मंडळ, निवळी कोष्टेवाडीचे सल्लागार, खाजगी नळ पाणी योजनेचे माजी अध्यक्ष तसेच देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरीचे सल्लागार म्हणून त्यांनी उल्लेखनीय व प्रेरणादायी काम केले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जाण्याने समाजाने एक कर्तृत्ववान, मार्गदर्शक आणि दिलदार व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जिवंत राहतील अशी श्रद्धांजली वाहण्यात आली.

पालवण वैकुंठ भूमी स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे सुजित व सनी उर्फ मंदार, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.