लांजा : कुसुमताई वंजारे महाविद्यालय येथे वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. युवा पिढीत वाघ संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुवर्णा पाटील, रत्नागिरी प्रादेशिकचे वनक्षेत्रपाल विक्रम गुरव व लांजा सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल साहेल शेख हे उपस्थित होते. दरम्यान, साहेल शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाघ हा जंगलातील अन्नसाखळीतील सर्वोच्च घटक असून त्याचे संवर्धन म्हणजे संपूर्ण जंगल आणि जलस्रोतांचे संरक्षण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना व्याघ्र संवर्धनासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
यावेळी टायगर फेस पेंटिंग व व्याघ्र संवर्धन विषयावरील निबंध स्पर्धा घेण्यात आली. फेस पेंटिंग स्पर्धेत भक्ती जाधव व याशिका ठकराल यांनी प्रथम, तर मृण्मयी करंजकर व रिया कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना चषक व वृक्षरोपे, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वृक्षरोपे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ.विक्रांत बेर्डे व डॉ.दिग्विजय लवटे यांनी वाघांच्या संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लांजा वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक सचिन कांबळे, श्रावणी पवार, सिद्धार्थ हिंगमिरे, नमिता कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
