चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत निवळी गाव येथे एक ओळीतील भात रोपलागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. विघ्नेश सकपाळ विशेष उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने भाताची रोपलागवड कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकादरम्यान योग्य वयाची रोपे, रोपांमधील आणि ओळींमधील शिफारशीनुसार अंतर, योग्य खोलीवर रोपांची लागवड तसेच शेतातील पाण्याचे व्यवस्थापन याविषयी प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. एक ओळीतील लागवड केल्यास सूर्यप्रकाश व हवा पिकाला पुरेशा प्रमाणात मिळते, आंतरमशागत आणि तण नियंत्रण सुलभ होते तसेच पिकाची वाढ जोमदार होऊन अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते, असे प्रा. विघ्नेश सकपाळ यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण कृषी कार्यानुभव च्या विद्यार्थ्यांनीही शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात उतरून रोपलागवड केली आणि आधुनिक भात लागवड तंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक बारकाईने पाहून विविध शंकांचे निरसन करून घेतले. त्यांनी या पद्धतीचा आपल्या शेतात अवलंब करण्याची तयारी दर्शविली.