चिपळूण : भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा होत असून, दूरवर राहणाऱ्या भावंडांसाठी चिपळूण डाक विभागाने विशेष तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चिपळूण विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकिटे विक्रीस उपलब्ध करण्यात आली असून, या पाकिटाची किंमत 12 रूपये ठेवण्यात आली आहे.
प्रत्यक्ष जाऊन भावाच्या हातावर राखी बांधणे अनेक बहिणींना शक्य होत नसल्याने डाक विभागाची ही सेवा मोठा दिलासा देणारी ठरत आहे. या विशेष पाकिटातून देशांतर्गत तसेच परदेशातही राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. स्पीड पोस्टद्वारे राखीचे जलद व सुरक्षित वितरण करण्यासाठी विभागाने आवश्यक पूर्वतयारी पूर्ण केली असून, टपालाचे वर्गीकरण करताना राखीच्या टपालाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच सैनिकांना राखी पाठविण्यासाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मागील वर्षी चिपळूण विभागामध्ये 18,752 विशेष राखी पाकिटांची विक्री झाली होती. तसेच स्पीड पोस्ट व रजिस्टर पोस्टद्वारे 7,654 राख्या देशातील विविध भागांत वितरित करण्यात आल्या होत्या. याशिवाय परदेशातही मोठ्या प्रमाणावर राख्या पाठविण्यात आल्या होत्या.
चिपळूण विभागातील सर्व माता-भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि अंतरामुळे रक्षाबंधन साजरे करता येत नसले तरी डाक विभागामार्फत आपले प्रेम भावापर्यंत नक्की पोहोचवावे, असे आवाहन अधीक्षक डाकघर, चिपळूण विभाग ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे. तसेच विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
याही वर्षी भावाबहिणीचा प्रेमाचा धागा पोहोचविण्यासाठी चिपळूण पोस्ट ऑफिस सज्ज..
