मोदी सरकार हे केवळ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर लाइव्हपुरते मर्यादित नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार हे मातोश्रीत बसून फेसबुक लाइव्हवर चालणारे सरकार होते. अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात येणारे उद्धव ठाकरे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इंस्टाग्रामच्या माध्यमातून जेन झी शी संवाद साधतात आणि ते आंध्र प्रदेशात लाखो लोकांच्या सभेला संबोधित करून गेले. अमितभाई दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात येऊन गेले. सातत्याने जनतेशी संवाद साधण्याचे काम ते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शाह कुठे आहेत, हे विचारण्यापेक्षा उबाठा गट महाराष्ट्रातून गायब झाला आहे त्याकडे लक्ष द्या, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रश्नांची सरबत्ती करत श्री. बन म्हणाले की, अमितभाईंचा राजीनामा कशासाठी मागत आहात? काश्मीरमध्ये कलम 370 हटवले म्हणून? काश्मीरमध्ये दगडफेक थांबवली म्हणून? बांगलादेशमधील घुसखोरी रोखली म्हणून? पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना घुसून मारले म्हणून? दहशतवाद्यांचा खात्मा केला म्हणून? तुमच्यासारख्या गद्दारांना धडा शिकवला म्हणून? की बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व जिवंत ठेवले म्हणून? ज्या पद्धतीने हिंदुत्वाशी गद्दारी करून तुम्ही राहुल गांधींचे लांगूलचालन करत आहात त्याला अमितभाईंनी विरोध केला म्हणून तुमचा जळफळाट होत आहे. अमितभाईंनी दहशतवाद, नक्षलवाद संपवला. अमितभाईंना जनतेने निवडून दिले आहे. 140 कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. तुमच्यासारख्या लोकांनी राजीनामा मागितल्याने काहीही फरक पडत नाही. आमचे अमितभाई 2029 पर्यंत गृहमंत्री राहतील आणि पुढेही अमितभाईंच्या नेतृत्वाखाली भाजपा मार्गक्रमण करत राहील.
ज्या समाजवादी पक्षाने प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारले होते त्यांना राम मंदिराबद्दल किंवा चंदा चोरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत श्री. बन म्हणाले, रोहित पवार यांनी दडपशाही काय, गुंडगिरी काय असते, हे एकदा आजोबांना जाऊन विचारावे. शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये गोवारी आदिवासी बांधवांचा मोर्चावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात अनेक आदिवासी बांधवांचे मृत्यू झाले होते. भाजपावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी याचे उत्तर द्यावे.