चिपळूण : जनतेच्या प्रश्नांवर केवळ निवेदने देवून शांत न बसता त्यांचा पाठपुरावा करून प्रशासनाला कृती करण्यास भाग पाडणारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची परंपरा पुन्हा एकदा चिपळूणमध्ये पाहायला मिळाली. मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल तसेच डी.बी.जे. कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांना एसटी बस न थांबल्यामुळे रोजच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. हा प्रश्न शिवसेना आणि युवासेनेने उचलताच अवघ्या काही तासांत एसटी महामंडळ प्रशासनाला दखल घ्यावी लागली.
काल समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मिरजोळी बसस्टॉपवर हात दाखवूनही चिपळूण-गुहागर मार्गावरील तब्बल सात एसटी बस विद्यार्थ्यांसाठी न थांबल्याचे स्पष्टपणे दिसून आले. परिणामी शालेय विद्यार्थ्यांना तब्बल तीन तासांहून अधिक काळ उन्हात उभे राहावे लागले. या प्रकारामुळे पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण एसटी आगार व्यवस्थापकांची भेट घेत निवेदन सादर केले. मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल बसस्टॉप आणि डी.बी.जे. कॉलेज बसस्टॉपवर प्रत्येक एसटी बस नियमित थांबविण्याची, तसेच विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित चालकांवर तात्काळ कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली. भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणारा असा प्रकार पुन्हा घडल्यास शिवसेना-युवासेना तीव्र आंदोलन उभारेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेचा परिणाम तात्काळ दिसून आला. निवेदनाची दखल घेत अवघ्या काही तासांत एसटी महामंडळाने मिरजोळी बसस्टॉपवर विशेष कर्मचारी नियुक्त करून प्रत्येक बस विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार थांबते की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. यानंतर बसस्टॉपवर एसटी बस नियमितपणे थांबू लागल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) तसेच चिपळूण आगार व्यवस्थापकांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहर प्रमुख श्री. सचिन (भैया) कदम व युवासेना चिपळूण शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. जनहिताच्या प्रश्नांवर संघर्ष जितका महत्त्वाचा, तितकीच प्रशासनाने तत्परतेने केलेल्या सकारात्मक कार्याची दखल घेणेही तितकेच आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
