मुंबई : प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांनी गजनी या चित्रपटात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवली होती. त्यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली.
यशपाल शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आपले ‘गजनी’ आणि ‘लगान’मधील देवा आता आपल्यात नाहीत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.” यासोबत त्यांनी दुःख व्यक्त करणारा इमोजीही पोस्ट केला.
प्रदीप रावत यांच्या निधनाच्या वृत्तामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेते बृजेंद्र काला यांनी, “अत्यंत दुःखद. ॐ शांती,” अशी श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
प्रदीप रावत यांचा जन्म २१ जानेवारी १९५२ रोजी झाला होता. त्यांचा विवाह कल्याणी रावत यांच्याशी झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
खलनायकाच्या भूमिका ठरल्या ओळख
प्रदीप रावत यांनी हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय काम केले. दूरदर्शन मालिकांपासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करून चित्रपटसृष्टीतही वेगळी छाप पाडली. विशेषतः खलनायकाच्या प्रभावी भूमिकांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
त्यांना प्रथम मोठी ओळख बी. आर. चोप्रा निर्मित महाभारत या मालिकेत साकारलेल्या अश्वत्थामाच्या भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर ‘गजनी’, लगान यांसह अनेक चित्रपटांतील त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
