मुंबई – डिजिटल युगातही आपल्या परंपरा जिवंत राहिल्या पाहिजेत… आपल्या बोलीभाषा… आपल्या लोककला …लोकसंगीत… हस्तकला जगल्या पाहिजेत आणि सांस्कृतिक वारसा पुढे चालला पाहिजे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आणि अशा कार्यक्रमातून नक्कीच चालना मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव कार्यक्रमाचे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजन केले होते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आदिवासी समाजाने देशातील जंगलांचे रक्षण केले… जलस्रोत जपले… जैवविविधतेचे रक्षण केले… आणि माणसाला निसर्गाशी सुसंवादाने जगण्याची शिकवण दिली. वातावरण बदल… ग्लोबल वॉर्मिग याबाबतचा जीवनमंत्र आदिवासी समाज शेकडो वर्षांपासून जगत आलेला आहे. म्हणूनच आदिवासी समाज हा केवळ विकासाचा लाभार्थीच नाही तर विकासाला दिशा देणारा समाज आहे असे ठाम मत सुनेत्रा अजित पवार यांनी मांडले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान अतिशय मोठे आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी देशवासियांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. राणी दुर्गावती यांनी शौर्याचा आदर्श घालून दिला तसेच महाराष्ट्राचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी अन्यायाविरुद्ध लढा उभारला या सर्वांचाच इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.
