खेड : तालुक्यातील आंबवली पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, आंबवली या विद्यालयाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ॲड. सौ. पी. सी. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली.
विद्यालयापासून आंबवली गावापर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करणारे विविध बॅनर तयार केले होते. या बॅनरवर ‘रस्ता सुरक्षा’, ‘वाहतूक नियमांचे पालन करा’, ‘हेल्मेट वापरा’, ‘जीवन सुरक्षित ठेवा’ अशा विविध घोषवाक्यांद्वारे नागरिकांना/ ग्रामस्थांना सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जाणीव व जागृती निर्माण करणे, तसेच परिसरातील नागरिकांना वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजावून देणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
या रॅलीमध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली.
विद्यालयाच्या या उपक्रमातून ‘सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास आणि सुरक्षित जीवन’ हा संदेश परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
आंबवली विद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली!
