मंडणगड : ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, आधुनिक आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भ.क.ल. वालावलकर रुग्णालय, रोग निदान आणि संशोधन केंद्र, डेरवण (सावर्डे) येथील वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते उपस्थित होते.
यावेळी मंगेश मोहिते म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि वेळेवर वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वैद्यकीय संचालिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुवर्णा पाटील यांनी रुग्णसेवेसोबतच ग्रामीण आरोग्य क्षेत्रात सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अभिजीत देवळेकर म्हणाले, “आरोग्यसेवा ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नसून मानवतेची सेवा आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी डॉ. सुवर्णा पाटील मॅडम यांचे योगदान उल्लेखनीय आहे. रुग्णसेवेला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कार्याप्रती समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.” ते पुढे म्हणाले, “‘सेवा संकल्प’ अभियानाचा उद्देश केवळ सेवा करणे एवढाच नसून, समाजासाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला सलाम करणे हाही आहे. रुग्णसेवा, समाजसेवा आणि मानवतेची भावना यांचा सुंदर संगम असलेल्या डॉ. सुवर्णा पाटील यांच्या कार्याचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे,” असे देवळेकर यांनी सांगितले.
या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, चिपळूण ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग, चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घाग, बूथ अध्यक्ष गणपत राणीम, दीपक मोहिते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्यसेवेत समर्पित योगदानाबद्दल डॉ. सुवर्णा पाटील यांचा सन्मान…
