देवरुख : बँक ऑफ इंडियाचा १२१ वा स्थापना दिन देशभरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रत्नागिरी झोनल कार्यालयासह झोनमधील ९४ शाखांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवरुख शाखेतही स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.

स्थापना दिनानिमित्त देवरुख येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखा इमारतीची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच फुग्यांची सुंदर सजावट करून शाखेला उत्सवी स्वरूप देण्यात आले होते.

स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नुकताच पार पडलेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून देवरुख परिसरातील ज्येष्ठ शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. ९४ वर्षीय श्री. रामचंद्र बोगार सर आणि ७५ वर्षीय श्री. श्रीरंग शिर्के सर यांना शाखेत विशेष निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

यानिमित्ताने शाखेच्या सर्व स्तरांतील ग्राहकांसाठी कस्टमर मीटिंगचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. यामध्ये श्री. गिरीश सरदेशपांडे (साखरपा), डॉ. प्रकाश पाटील (देवरुख), श्री. नूरुल सिद्धीकी होडा, श्री. नजीर साटविलकर, हॉटेल पंगतचे मालक श्री. अमरदीप शेटे सहपत्नीक, शहाणे मॅडम, श्री. प्रकाश बाळेकुंद्री यांच्यासह सुमारे ५० ते ६० ग्राहक उपस्थित होते.

उपस्थित ग्राहकांच्या साक्षीने सन्माननीय ग्राहक श्री. गिरीश सरदेशपांडे यांच्या हस्ते केक कापून बँक ऑफ इंडियाचा १२१ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर ग्राहकांमध्ये पेढे, चॉकलेट, बटाटेवडा, केक व चहाचे वाटप करून स्थापना दिनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

ग्राहकांशी आत्मीयतेचे नाते अधिक दृढ करण्याबरोबरच बँकेच्या विविध सेवा, ग्राहकाभिमुख उपक्रम आणि भविष्यातील वाटचालीबाबतही यावेळी सकारात्मक वातावरणात संवाद साधण्यात आला. ग्राहकांचा उत्स्फूर्त सहभाग ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाखा प्रबंधक श्री. गौरव सिंग व विनोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित केणी, पायल नागतोडे, सुधीर, कॅशिअर मयूर धाकडे, वैभव देशमुख, रोहन कामत, अवॉर्ड स्टाफ स्वप्नील पाटील, योगेश कदम, रजनीकांत नारकर आणि सिद्धेश कदम यांनी केले.

बँकिंग पलीकडील नाते जपत, ग्राहकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि बँकेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करत देवरुख शाखेने १२१ वा स्थापना दिन आगळ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा केला.