चिपळूण: येथील वालोपे परिसरात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा अत्यंत जलदगतीने तपास करून संशयित आरोपी पवन जयंत आंबेडे ह्याला गजाआड केल्याबद्दल चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, तपास पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि क्रेडाई चिपळूण यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
पोलीस दलाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस जयंत शेठ खताते, तालुकाध्यक्ष नितीन (अबू)शेठ ठसाळे, शहर उपाध्यक्ष सलीम भाई पालोजी, तसेच क्रेडाई चिपळूणचे अध्यक्ष शकीलभाई चौगुळे, सचिव प्रसाद शेठ खातू, माजी अध्यक्ष जावेदभाई दलवाई आणि संतोष शेठ तडसरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या…..