चिपळूण : तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील विकास वसंतराव घाग आणि त्यांचे बंधू महेश वसंतराव घाग यांनी गेल्या १६ वर्षांपासून जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देत निःस्वार्थ समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, केवळ सामाजिक बांधिलकीतून ते दरवर्षी स्वखर्चाने १२ ते १५ वनराई बंधारे उभारतात. त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरावे, भूजलपातळीत वाढ व्हावी, विहिरी व कूपनलिकांना पाण्याचा आधार मिळावा आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी व्हावी, या उद्देशाने घाग बंधू वनराई बंधारे उभारतात. दहिवली बुद्रुकपुरते मर्यादित न राहता परिसरातील इतर गावांमध्ये तसेच रस्त्यांच्या कामांच्या परिसरातही ते वनराई बंधारे उभारण्यासाठी पुढाकार घेतात.
मुक्या जीवांसाठीही पाण्याची व्यवस्था
जलसंवर्धनाबरोबरच वन्यजीवांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय आहे. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन घाग बंधू दुर्गम जंगल परिसरात पाण्याचे डुरे खणून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतात. माणसांबरोबरच जंगलातील पशुपक्षी आणि वन्यप्राण्यांची तहान भागावी, या भावनेतून त्यांचे हे कार्य सुरू आहे.
जलसंवर्धन चळवळीचे मार्गदर्शक
स्वतःच्या कामातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही वनराई बंधाऱ्यांची उभारणी, पाणी अडविण्याचे तंत्र आणि पाण्याचे योग्य नियोजन याबाबत ते मार्गदर्शन करतात. पावसाळ्यातील पाणी योग्य पद्धतीने अडविल्यास उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होऊ शकते, हा विचार ते समाजापर्यंत पोहोचवत आहेत.
पंचायत समिती स्तरावर कार्याचा गौरव
विकास घाग यांच्या जलसंवर्धन आणि सामाजिक कार्याची दखल प्रशासकीय स्तरावरही घेण्यात आली आहे. पंचायत समिती चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने सन २०१५-१६ मधील कार्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते. दहिवली येथील दहा बंधारे बांधण्यासाठी केलेले विशेष सहकार्य तसेच उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दुर्गम जंगल परिसरात डुरे खणण्याच्या कार्याचा प्रशस्तीपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
तत्कालीन सरपंच रुपेश रविंद्र घाग यांनी या कार्याची माहिती प्रशासकीय स्तरावर पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिपळूण यांच्या स्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रसिद्धीपेक्षा कर्तृत्वाला प्राधान्य
स्वतःचा वेळ, श्रम आणि आर्थिक साधनांचा उपयोग समाजहितासाठी करून घाग बंधू गेल्या १६ वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता जलसंवर्धनाचे कार्य करीत आहेत. गावातील पाणीप्रश्न, भविष्यातील पाण्याची गरज, पर्यावरणाचे संतुलन आणि वन्यजीवांचे संरक्षण या दृष्टीने त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
दहिवली बुद्रुक येथून सुरू झालेली ही जलसंवर्धनाची चळवळ इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. विकास वसंतराव घाग आणि महेश वसंतराव घाग यांच्या निःस्वार्थ, सातत्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
