चिपळूण : शहरात दोन ठिकाणी झाडे कोसळून नुकसान व वीज पुरवठा खंडीत चिपळूण : शहरात आज सोमवारी पावसामुळे पुरसदृष्यस्थिती असून वाशिष्ठी नदी व शिवनदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
शहरातबाजार पुलाजवळ ताकीया मशिद व सार्वजनिक शौचालयावर झाड पडून नुकसान झाले. काही गावात विजेचे पोल कोसळल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता त्याची दुरुस्ती करून काही भागात काल वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. चिपळूण आगारातून मुंबई मार्गावर जाणाऱ्या गाड्या बंद होत्या. रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. आज व उद्या दोन दिवस ऑरेंज अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज पावसामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.
मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. वशिष्ठी नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. सायंकाळी ४ वाजता पाण्याची पातळी ४.१० मीटर होती. पावसाने उघडीप दिल्याने ही पातळी कमी होत जाईल. आज सकाळपासूनच पाऊस सरीवर पडत होता. अधूनमधून पाऊस विश्रांती घेत असल्याने पाणी झपाट्याने खाली जात होते. पावस कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. आज सकाळी ८ वाजेपर्यंत १७४.७७ मि.मी. तर एकूण १०११.१० पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शहरात तायिका मशिद व शौंचालयावर झाड पडले तर पाग गोरीवले वाडी येथे रस्त्यावर झाड पडून वीजेच्या तारा तुटल्या. हे वृत्त समजताच नगरसेवक फैंसल कास्कर, नगरसेवक विकी नरळकर, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक शितल रानडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या राधिका तटकरे, सामाजिक कार्यकर्ते नैंनेश तांबडे व ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहाणी केली. वीज वाहिन्या चालू असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती परंतु या नगरसेवकांनी तातडीने हालचाली करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना महिती दिली. येथील वीज पुरवठा आज बंदच राहणार असून उद्या काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. वगळता पावसामुळे कोठेही मोठी हानी किंवा जीवित हानी झालेली नाही. मुंबई – गोवा महामार्गावर खवटी येथे कोसळलेली दरड व परशुराम येथे रस्त्यावर आलेले दगड हटवल्याने वाहतूक १२ तासाने सुरु झाली. चिपळूण आगारातून दुपारी चिपळूण-बोरीवली ही गाडी सोडण्यात आली परंतु अन्य कोणतीही गाडी मुंबईकडे सोडण्यात आली नाही. तालुक्यात सर्व नद्यानाल्यांचे पाणी वाढले असले तरी कोठेही हानी झाल्याचे वृत्त नाही.