दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दापोली तालुक्याच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली असून १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनापासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. या संदर्भात भाजपच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
दापोली भाजप कार्यालयात यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप नेते केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, शहर तालुकाध्यक्ष जया साळवी, दापोली तालुकाध्यक्ष (ग्रामीण) सचिन होडबे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम (भाऊ) ईदाते, संदीप केळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत दापोली तालुक्यातील विविध प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
गाडीतळ येथील तालुका स्कूलच्या जागेवर राष्ट्रीय स्मारकाची मागणी
भाजपने मांडलेल्या मागण्यांमध्ये दापोली शहरातील गाडीतळ येथील सध्या बंद असलेल्या तालुका स्कूलच्या जागेवर दापोली तालुक्यातील भारतरत्नांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे, ही प्रमुख मागणी आहे. या जागेचा योग्य वापर करून दापोलीच्या ऐतिहासिक आणि सामाजिक वारशाला साजेसे स्मारक उभारल्यास त्याचा पर्यटन आणि स्थानिक विकासाला फायदा होऊ शकतो, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे.
दापोली-खेड, दापोली-मंडणगड रस्त्यांची दुरवस्था
दापोली तालुका हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणूनही ओळखला जातो. दापोली शहरासह समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि ग्रामीण भागात वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक व नागरिकांची ये-जा सुरू असते.