खालापूर, ता. 19मार्च, बातमीदार-घरातील दैनंदिन सामान खरेदी करण्यासाठी खोपोली बाजारपेठेत गेलेल्या महिलेच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी बेडरूम मधील कपाटातील एकूण 1लाखस70 हजार रुपये व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.
खोपोली पोलीस ठाणे हद्दीत मुळगाव खोपोली येथे राहणारी महिला आणि तिचा मुलगा मंगळवारी (17मार्च रोजी) सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सामान खरेदी करण्यासाठी खोपोली बाजारपेठ मध्ये गेले होते. दैनंदिन सामान खरेदी करुन घरी परत आल्यानंतर घराचे दरवाजाचे कुलुप तोडल्याचे लक्षात आले. घरात जावून पाहिले असता लोखंडी कपाटाचे व लॉकरचे लॉक तोडुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळून आले. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस जगताप हे करीत आहेत.