मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड येथे पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व बचावकार्याबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात एन.डी आर. एफ. पथकाचे मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी व पर्यवेक्षक शांताराम बैकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
एन.डी. आर.एफ.चे हवालदार तथा कमांडर सुनील इदाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विद्यार्थ्यांना आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार, बचावकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रेस्क्यूअर हवालदार काशी नाईक यांनी हृदयाशी संबंधित समस्या उद्भवल्यास करावयाचे प्रथमोपचार व त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. रेस्क्यूअर हवालदार प्रशांत पाटील यांनी रक्तस्राव नियंत्रणाबाबत माहिती दिली.
रेस्क्यूअर हवालदार गजानन शिंदे यांनी घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून रुग्णासाठी स्ट्रेचर (स्ट्रक्चर) कसे तयार करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कशा पद्धतीने करता येते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मारुती चव्हाण यांनी पूरपरिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, पुराच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी, याचे प्रत्यक्ष साधनांच्या साहाय्याने प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळात प्रसंगावधान राखण्याचे महत्त्वही पटवून देण्यात आले. एन.डी.आर.एफ. जवानांचे मुख्य ध्येय ‘आपदा सेवा सदैव सर्वत्र’ हे घोषवाक्य असल्याचे हवालदार तथा कमांडर सुनील इदाते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून स्पष्ट केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपत्तीच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून स्वतःचा तसेच इतरांचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेले मौल्यवान ज्ञान मिळाले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख बजरंग गावडे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रमोद जाधव यांनी एन.डी.आर.एफ. पुणे पथकाचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले.