मिझोरम : मिझोरम दौऱ्यासाठी दिल्लीहून आइजोलकडे रवाना झालेल्या IndiGo 6E 291 या विमानातील प्रवासादरम्यान एका प्रवाशाची अचानक प्रकृती अत्यंत गंभीर झाली. प्रवाशाची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याने विमानातील वातावरण चिंताजनक बनले होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा डॉक्टर डॉ. भागवत कराड साहेब यांनी क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत संबंधित प्रवाशाच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घेतला.
प्रवाशाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन डॉ. कराड साहेब यांनी विमानातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांच्या मदतीने तातडीने आवश्यक उपचार सुरू केले. प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन देण्यात आला. विमानातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रवाशाला आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
आइजोल विमानतळावर विमानाचे आगमन होताच प्रवाशाला विलंब न करता ऑक्सिजनच्या सुविधेसह रुग्णवाहिकेतून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळावी आणि त्यांना पुढील उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी डॉ. कराड साहेब यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली.
राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या मूळ वैद्यकीय पेशेप्रती असलेली निष्ठा, सेवाभाव आणि माणुसकीची जाणीव जपणे, हेच डॉ. भागवत कराड साहेबांच्या या कृतीतून अधोरेखित झाले. पद, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या यांपलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी संकटाच्या क्षणी तत्परतेने धावून जाणे, हीच खऱ्या अर्थाने मानवसेवा आहे.
