चिपळूण : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खे॑ड (चिपळूण) येथील विभा अरविंद ग्रंथालयाच्या वतीने रविवारी दिनांक ९ ऑगष्ट रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ : इतिहास, समाज आणि पर्यायी इतिहासलेखन” या विषयावर डॉ. राज ताडेराव (फोंडाघाट) मार्गदर्शन करणार आहेत.
हे व्याख्यान रविवारी सकाळी १०.३० वाजता विभा अरविंद ग्रंथालय, खे॑ड येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बापूसाहेब काणे राहणार आहेत. यावेळी कार्यवाह श्री. विजय कदम, संचालक प्रा. विकास मेहेंदळे तसेच चिपळूण नगरपालिकेचे नगरसेवक श्री.संदीप भिसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने वंचित, उपेक्षित आणि श्रमिक समाजजीवनाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या गाजलेल्या ‘फकिरा’ कादंबरीतून इतिहास, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि परिवर्तनाचा प्रभावी वेध घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘फकिरा’कडे इतिहास आणि समाजाच्या नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या व्याख्यानातून साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
साहित्य, इतिहास आणि समाजपरिवर्तनाच्या विविध पैलूंवर सखोल विवेचन ऐकण्यासाठी साहित्यप्रेमी, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभा अरविंद ग्रंथालय संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.