नवी दिल्ली : निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे पण निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाची कठपुतली बनून घोटाळे करत आहे. निवडणुका हा केवळ फार्स बनला असून सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार सुरु आहे, हे लोकशाही व संविधानासाठी अत्यंत घातक आहे म्हणूनच लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी एकत्र आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना जावेच लागेल, त्यांचा पहिला नंबर लागेल आणि त्यानंतर रंगा-बिल्लाचा नंबर आहे, असे घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संसदेत जनतेचे प्रश्न मांडले जातात, देशातील महत्वाच्या विषायावर चर्चा होते पण संसदेत विरोधी पक्षाला बोलूच दिले जात नाही. विरोधी पक्ष नेत्यालाही बोलू दिले जात नाही हे जगाने पाहिले आहे. सरकारच्या या मनमानी कारभाराचा विरोधी पक्षांना मोठा फटका बसत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मॉक पार्लमेंट घेण्यात आली. सरकार बाहेर बुलडोझर चालवते तसेच सभागृहातही चालवते. सभागृहमधे फक्त नो-नो सुरू असते. राहुल गांधी यांनी ज्ञानेशकुमारचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने मांडला आहे. आज जगात भारताची नाचक्की होत आहे, त्याला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारच जबाबदार आहेत म्हणून ज्ञानेशकुमाराला पदावरून हटवले पाहिजे आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे हेही समजले पाहिजे.
सपकाळ पुढे म्हणाले की, रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या महारॅलीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून ५ हजार लोक दिल्लीत येत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्वांना दृढ विश्वास असून देशाला या कठीण प्रसंगातून तेच बाहेर काढू शकतात. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य चळवळीत सर्व जाती धर्माला एकाच झेंडाखाली आणून मोठा लढा दिला, आज तीच वेळ आली असून आपले स्वातंत्र, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हा लढा महत्वाचा आहे असेही सपकाळ म्हणाले.
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल जे विधान केले ते अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. संजय गायकवाड हे सातत्याने बेताल व विकृत वक्तव्य करत असतात पण त्यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा मुख्यमंत्री फडणवीस काहीच कारवाई करत नाहीत. हा सत्तेचा माज असून हा माज जनताच उतरवेल असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
महायुती सत्तेसाठी एकत्र..
भाजपा महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत पण ते केवळ सत्तेसाठी एकत्र आहेत. महायुतीमध्ये भाजपाची दादागिरी सुरु आहे परंतु सरकारमधील घटक पक्षातील वाद कितीही वाढले तरी तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असे आहे असा टोलाही सपकाळ यांनी लगावला..
