खालापूर : तालुक्यातील निगडोली गावात मंगळवारी सकाळी उघडकीस आलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. घरात राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध दाम्पत्याची अज्ञात हल्लेखोरांनी गळा चिरून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ दत्तू फराट (७५) आणि त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फराट (७२) हे निगडोली गावात एकटे राहत होते. रघुनाथ फराट हे बँकेतून सेवानिवृत्त झालेले होते. त्यांची मुले खोपोली व खालापूर येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी दिवसभर वडिलांचा मोबाईल लागत नसल्याने मुलाला संशय आला. त्यामुळे त्यांनी नातवाला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. नातू घरी पोहोचताच त्याला धक्काच बसला. आजी-जोबा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे अन्वेषण पथक तसेच फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांकडून घराची पाहणी करून हत्या नेमकी कधी झाली, कोणत्या कारणातून झाली आणि आरोपी कोण आहेत याचा तपास सुरू आहे. चोरी, वैयक्तिक वैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून ही घटना घडली असावी, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.