लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंजणारी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
महामार्गाच्या कामातील त्रुटींमुळे आंजणारी परिसरात वारंवार अपघात होत असून मागील काही महिन्यात अपघात घडत आहेत. या अपघातांमध्ये वाहनांचे नुकसान, प्रवाशांना दुखापती, जीवितहानी आणि आर्थिक नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांनाही जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती.
अपघात रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी अशी मागणी शिवसेना उबाठाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाकडून गांभीर्याने दखल न घेता तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या मागण्यांसाठी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या उपस्थितीत आंजणारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलनाला परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा असे आवाहन शिवसेना उबाठाच्या वतीने करण्यात आले आहे.