लांजा: विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांसाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असून या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण केले जात आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या निर्देशानुसार लांजा शहरी भागातही सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणात ४०९ एकल महिला आढळल्या आहेत.

एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या धोरणात घरकुल, पेन्शन, कौशल्य विकास, स्वयंरोजगार यांसह विविध योजनांमध्ये विशेष सवलती देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सर्वेक्षणातून एकल महिलांची अचूक संख्या आणि त्यांची माहिती संकलित करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

नगरविकास विभागाने ५ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींना एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लांजा नगरपंचायतीमध्ये कार्यवाही सुरू आहे. या सर्वेक्षणात मुख्याधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, १५ सप्टेंबरपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर लांजा शहरी भागातील सर्वेक्षणातून आतापर्यंत ४०९ एकल महिला आढळल्याची प्राथमिक माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.