चिपळूण (विशेष प्रतिनिधी): दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शासन आपल्या परीने विविध उपाययोजना करीत आहे. मात्र त्याचबरोबर लोकसहभागातून या कठीण प्रसंगावर सर्वांनी एकत्रित मात करूया असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी दैनिक सागरच्या सागर वेव्ह या युट्युब वाहिनीशी बोलताना केले.
आमदार निकम म्हणाले की, येत्या शुक्रवारी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. चिपळूण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी आपण पाठपुरावा करीत असून लवकरच हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांनी मिळून या कठीण प्रसंगावर मात करूया असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
