मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत असताना या प्रवासात मुंबईचे योगदान कायम अग्रणी राहील, असा विश्वास भाजपा मुंबईचे अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला. मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये झालेला बदल आणि भविष्यातील विकासाची दिशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व कंटेंट क्रिएटर्सनी प्रत्यक्ष अनुभवावी, यासाठी भाजपा मुंबईच्या वतीने आयोजित ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
सेवा संकल्प अभियान आणि ‘विकसित भारत @२०४७’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित या विशेष दौऱ्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना मुंबईतील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची माहिती घेण्याची संधी मिळाली. या विकासकामांचा प्रवास डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या दौऱ्यामागे होता.
मुंबईच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडताना आमदार साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि आगामी नियोजनाचा आढावा घेतला. मुंबईची वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित प्रश्नांवर भविष्यातील नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या ‘स्पिरिट’चा उल्लेख करताना साटम म्हणाले की, संकटाच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही मुंबईची खरी ताकद आहे. २६ जुलैच्या पुराच्या वेळी मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून एकमेकांना केलेली मदत हे मुंबईच्या स्पिरिटचे उत्तम उदाहरण आहे.
मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या हक्काच्या घराच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. वरळी आणि शिवडी येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा संदर्भ देताना, पुनर्विकासाच्या माध्यमातून मूळ रहिवाशांना त्याच परिसरात हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.
भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना साटम यांनी देशात वर्षभर विविध सण-उत्सव साजरे होतात आणि या परंपरांमुळे समाजातील परस्परांची बांधिलकी टिकून राहते, असे सांगितले. सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सातत्य ही भारताची वैशिष्ट्यपूर्ण ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिद्धिविनायक दर्शनाने विकासदौऱ्याला सुरुवात
‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ची सुरुवात प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दर्शनाने झाली. यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाचे कोषाध्यक्ष तथा भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांनी सहभागी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सचे स्वागत केले. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्थानकातून अॅक्वा लाईनने चर्चगेटपर्यंत प्रवास करण्यात आला. पुढे अटल सेतूमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराला भेट देण्यात आली. त्यानंतर ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाला भेट देण्यात आली.
दौऱ्याचा अंतिम टप्पा कोस्टल रोडमार्गे वरळी प्रोमेनेड येथे झाला. येथे आमदार साटम यांच्यासोबत विशेष टॉक शो आणि संवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबईतील विकासकामे, त्यांचा नागरिकांना होणारा लाभ, मुंबईची बदलती पायाभूत रचना आणि भविष्यातील विकासाची दिशा यावर त्यांनी सहभागी इन्फ्लुएन्सर्स व कंटेंट क्रिएटर्सशी संवाद साधला.
भाजपा मुंबईचे सचिव तथा नगरसेवक प्रतिक कर्पे, भाजपा मुंबई सोशल मीडिया संयोजक नचिकेत सहस्त्रबुध्दे यांच्या समन्वयाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. मुंबईच्या विकासाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
