लोटे : (ज्ञानेश्वर रोकडे) : लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये चक्क रसायने व रासायनिक सांडपाणी गेटमधून उघड्यावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री दुर्गा ऑर्गेनिक्स या दोन रासायनिक कंपन्या एकाच मालकाच्या असून, घटना घडली त्यावेळी कारखान्यात मालक, व्यवस्थापक अथवा अन्य कोणतीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हती.
आजूबाजूच्या कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना तसेच नजीकच्या ग्रामस्थांना रासायनिक वायूचा त्रास जाणवल्यानंतर संतप्त ग्रामस्थ कारखान्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र, कारखान्याच्या वतीने माहिती देण्यासाठी कोणीही बाहेर आले नाही.
घटनेची माहिती मिळताच विनंती ऑरगॅनिक या कारखान्यातील सेफ्टी टीम आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाली. मात्र, त्यानंतरही संबंधित कारखान्यातून कोणताही प्रतिनिधी अथवा कर्मचारी बाहेर आला नाही.
औद्योगिक वसाहतीमध्ये अशा प्रकारचे भीषण प्रदूषण वारंवार होत असून, संबंधितांना कोणाचाही धाक उरलेला नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सदर कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कारखाना निरीक्षक तसेच इतर संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करून कारखान्याचे उत्पादन तात्काळ बंद करावे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
