चिपळूण : बहुतांश बँकांमध्ये दिव्यांगांसाठीच्या व्हीलचेअरची व्यवस्था नसल्यामुळे दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना, कर्करोगग्रस्त रुग्ण तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांतील लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाते. ही पेन्शन केंद्र व राज्य शासनाने बँक खात्यात जमा करण्याऐवजी पोस्टामार्फत संबंधित लाभार्थ्यांच्या घरी पोहोचवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनीलजी तटकरे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांना या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम सादर करणार आहेत.
मुकादम यांनी निवेदनात म्हटले आहे की, संबंधित लाभार्थ्यांना पेन्शन घेण्यासाठी बँकेत येण्यासाठी आर्थिक खर्च करावा लागतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणे संबंधित लाभार्थ्यांची पेन्शन पोस्टामार्फत गावोगावी घरपोच पाठविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.