जळगाव : “ज्यांनी खऱ्या श्रद्धेने दान दिले नाही, त्यांचेच दान चोरीला गेले आहे,” असे म्हणत उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार सतीश महाना यांनी रामभक्तांच्या श्रद्धेची खिल्ली उडविल्याचा आरोप होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महाना यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रोहिणी खडसे यांनी महाना यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे, “घरात अन्नाचा कण नसतानाही आपल्या पदराच्या गाठीशी बांधलेला रुपया लोकांनी राम मंदिराच्या दानासाठी दिला आहे. आणि हा कोण कुठला महाना त्यांची श्रद्धा खोटी ठरवतोय? प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानपेटीतून दानाची चोरी तुम्ही करायची आणि मग भक्तांच्याच श्रद्धेवर शंका घ्यायची? यालाच ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात,” अशी टीका त्यांनी केली.
पुढे त्या म्हणाल्या, “अशांसाठी एक फार समर्पक गाणे आहे — पिते दूध डोळे मिटून जात मांजराची,
मनी चोरट्यांच्या का रे भीती चांदण्यांची!”