खेड : दापोली तालुक्यातील माटवण गावचे ज्येष्ठ नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे खंबीर नेतृत्व तसेच आंबेडकरवादी चळवळीतील झुंजार नेतृत्व मधुकर मर्चंडे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दि. २० मार्च २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्वर्गीय मधुकर मर्चंडे हे दापोली तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीचे झुंजार नेतृत्व आणि वंचित बहुजन आघाडीचे खंबीर नेते होते. ते अमोघ वाणीने विचाराची पेरणी करणारे उत्कृष्ट वक्ता होते. मृत्यूशी कडवी झुंज देत, शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ रोजी डेरवण हाॅस्पीटल, चिपळूण येथे त्यांची प्राणज्योत मावळली. ही बाब त्यांच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांनीच त्यांच्या घरी रांग लावली होती. मधुकर मर्चंडे हे केवळ राजकारणी नव्हते तर प्रगल्भ विचारसरणीची नाळ या मातीशी जुळली होती. ते उत्तम शेतकरी होते. सामाजिक क्षेत्रात काम करताना नेहमीच वंचितसाठी आवाज उठविला होता. मधुकर मर्चंडे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे निकटचे जवळचे सहकारी होते. कामगार नेते कै. दत्ता सामंत यांच्या युनियन चळवळीत मधुकर मर्चंडे यांनी काम केले आहे. अशा या झुंजार नेत्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे खंबीर नेते मधुकर मर्चंडे यांचे निधन !
