मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची २०० वी जयंती, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जयंती देशभर साजरी केली जाणार आहे. त्यामुळे समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या महामानवांचे कार्य व विचार घेऊन काम करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने राज्यभर संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे जयंती साजरी करण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांवर अभिवादन कार्यक्रम आयोजित करतील. तसेच पक्षाच्या कार्यालयात दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येईल, तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा, तालुका, शहर व गाव स्तरावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी व्याख्याने, परिसंवाद किंवा विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.